चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत : Method Of Making Compost Best 0

Method Of Making Compost

चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत आपण तयार करू शकाल . पिकांचे योग्य वाढीसाठी , जमिनीतील पोषक द्रव्य , पाणी आणि सूर्यप्रकाश यांची अत्यंत आवश्यकता असते . जमीन हे पिकांच्या अन्नद्रव्यांचे कोठार आहे .ही अन्न द्रव्य शेतकरी पालापाचोळा, कंपोस्ट खत , शेणखत हिरवळीचे खत व रासायनिक खत याद्वारे शेतात घालतो .

सेंद्रिय अगर रासायनिक खताचा अजिबात किंवा पुरेसा वापर न करता त्याच शेतात पिका मागून पिके घेत गेल्यास जमिनीचा कस कमी होत जातो . म्हणजे ही अन्नद्रव्य पिकांनी घेतल्यामुळे जमिनीत त्यांचे प्रमाण कमी होत जाते व त्या प्रमाणात जमिनीचा कस कमी होऊन पिकांचे उत्पादन कमी होते .

रासायनिक खता द्वारे दिली जाणाऱ्या अन्नद्रव्य ही पाण्यात जलद विरघळतात व पिकांना त्वरित उपलब्ध होतात .या खतांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाणही खूप असते . परंतु ही खते जमिनीत सतत वापरल्याने जमिनीचा कस कमी होतो. जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंचे प्रमाण कमी होते व त्यामुळे उत्पादन वाढीवरील त्यांचा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत जातो . शेतकरी बंधूंनी पिकांना निव्वळ रासायनिक खते न देता त्याबरोबर सेंद्रिय खत देण अत्यंत गरजेचे व निकडीचे आहे . जमिनीत जे अनेक प्रकारचे जिवाणू असतात त्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे काही जिवाणू असतात . प्राय: हे जिवाणू जमिनीत पडलेला पालापाचोळा, काडीकचरा यांचे अव्यहातपणे विघटन करीत असतात . त्यांच्या या क्रियेमुळे सेंद्रिय पदार्थांचे मातीच्या कणांशी जवळीक साधणाऱ्या सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर होते आणि त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा साठा वाढवून जमिनीच्या सुपीकतेमध्ये मोलाची भर पडते.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

जमिनीचा पोत सुधारण्याच्या दृष्टीने सेंद्रिय खताचे महत्त्व फार आहे. मातीचे कण एकमेकांना घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीतील हवा खेळती राहते . जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते . पिकांच्या मुळाना व सूक्ष्म जीवाणूंना पुरेशी हवा, पाणी मिळाल्याने त्यांचे कार्य उत्तम चालते . या खतामधील अन्नद्रव्य पिकांना त्यांच्या गरजेप्रमाणे हळूहळू उपलब्ध होतात . त्यामुळे अन्नद्रव्य पाण्याबरोबर वाहून जात नाहीत किंवा हवेत उडूनही जात नाहीत.

Method Of Making Compost

शेतामध्ये कितीतरी सेंद्रिय पदार्थ मोबलोक प्रमाणात उपलब्ध असतात. उदाहरणार्थ गवत , पालापाचोळा , पिकांची दाटे , जनावरांचे मलमूत्र , पिकांचे धान्य व्यतिरिक्त शेष भाग या सेंद्रिय पदार्थांपैकी काही पदार्थ थोडेफार कुजवून लगेच शेतात वापरता येतात . काहींना मात्र बरेच दिवस कुजावावे लागते . त्याशिवाय ते शेतात वापरता येत नाहीत . शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे सेंद्रिय पदार्थ उसाचे पाचट , गव्हाचे काड हे शेतकरी बहुदा जाळून टाकतात व त्यामुळे त्यापासून मिळणारे अत्यंत मौलिक असे सेंद्रिय खत वाया जाते . उसाचे पाचट हेक्‍टरी सात ते आठ टन एवढे असते . तर गव्हाचे काड दोन ते पाच टन एवढे असते व त्यापासून जर कंपोस्ट तयार केले तर जवळजवळ तेवढेच ओले कंपोस्ट खत मिळते.

हेच कंपोस्ट खत जर आपण त्याच शेतात घातले तर वरील पिकांना जमिनीतून शोषून घेतलेल्या अन्नाशापैकी काही अन्नाश तरी जमिनीत या खाता द्वारे टाकला जाईल . उसाची पाचट , गव्हाची काड , पिकांची धांडे , पालापाचोळा हे सेंद्रिय पदार्थ जरी कुजण्यास कठीण असते तरी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास कुजन्याची क्रिया जलद होते व अन्नद्रव्यांनी युक्त असे कंपोस्ट खत लवकर उपलब्ध होते . सेंद्रिय पदार्थांपासून जलद कंपोस्ट खत तयार करण्यासाठी नवीन शास्त्रीय पद्धतीमध्ये पाच महत्त्वाच्या गोष्टी करावे लागतात.

१) जिवाणूंचा वापर :-
सेंद्रिय पदार्थांचे विघटन हे सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जिवाणूमुळे होते व त्याचे कंपोस्ट खतात रूपांतर होते . हे जिवाणू जेवढे अधिक कार्यक्षम तेवढी विघटनाची क्रिया जलद होऊन कंपोस्ट करत लवकर तयार होते. म्हणून प्रयोग शाळेत उपलब्ध सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यात कार्यक्षम ठरलेलेच जिवाणू वापरावेत . हे जिवाणू एक टन काडी कचऱ्याचे कंपोस्ट खड्डे भरताना अर्धा किलो या प्रमाणात वापरावेत.

२) पाणी :-
वरील जिवाणूंच्या वाढीसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते . म्हणून कंपोस्ट खड्डे भरताना आणि खड्डे भरल्यानंतर खड्ड्यातील पालापाचोळा ओला राहील याची दक्षता घ्यावी लागते . म्हणून खड्डे भरताना पालापाचोळा , धसकटे इत्यादी सर्व सेंद्रिय पदार्थांवर पाणी शिंपडावे व खड्डे भरल्यानंतरही आवश्यकतेनुसार खड्ड्यावर पाणी शिंपडावे . जेणेकरून कुजणारा पालापाचोळा ओला राहील म्हणजे त्यामध्ये 60% पाणी राहील . मात्र खड्ड्यात पाणी साठवून राहील असे जादा पाणी टाकू नये . आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जादा पाण्यामुळे कुजण्याची क्रिया मंदावते.

३) सेंद्रिय पदार्थांचा प्रकार :-
कडधान्याचा पालापाचोळा हा तृण धान्येच्या पालापाचोळ्या पेक्षा जलद कुचतो . कारण त्यामध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते . त्याचप्रमाणे वनस्पतीचे कोवळे भाग हे जुनाट भागापेक्षा लवकर कुजतात . म्हणून कंपोस्ट खड्डे भरताना उसाचे पाचट , गव्हाचे काड , ज्वारी बाजरीचे धाटे याबरोबर भुईमुगाचे वेल , सोयाबीन , मूग , हरभरा , उडीद , घेवडा यांचा पालापाचोळा वापरल्यास कुजण्याची क्रिया जलद होते व कंपोस्ट लवकर तयार होते . त्याचप्रमाणे वरील वाळलेल्या सेंद्रिय पदार्थाबरोबर घाण पाण्यावर वाढणारे वॉटर हायसिंथ , ऍझोला व इतर वनस्पतींचे कोवळे भाग वापरले तरी सुद्धा कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते .

म्हणून एकाच प्रकारच्या काडी कचऱ्याने खड्डे न भरता त्याबरोबर कडधान्याच्या किंवा कोवळ्या वनस्पतींचा सहभाग करावा . तसेच काडीकचऱ्याचे लहान तुकडे हे मोठ्या तुकड्यापेक्षा लवकर कुजतात म्हणून कुजण्यास कठीण असणाऱ्या पदार्थांची लहान लहान तुकडे केल्यास कंपोस्ट खत लवकर तयार होते . कंपोस्ट खड्डे भरताना जनावरांच्या मल मुत्राचा उपलब्धतेनुसार वापर करावा.

४) कर्ब : नत्र प्रमाण :-
उसाचे पाचट , गव्हाची काड व इतर कठीण प्रकारच्या काडी कचऱ्यामध्ये कर्ब : नत्राचे प्रमाण अधिक असते. हे प्रमाण जेवढे अधिक तेवढे ते कुजन्यास जास्त वेळ लागतो . अशा प्रकारचे सेंद्रिय पदार्थांचे कर्ब : नत्र प्रमाण युरिया सारखी नत्र असणारी रासायनिक खते टाकून कमी करता येते. म्हणून गव्हाचे काड , उसाचे पाचट यापासून कंपोस्ट करताना प्रति टन एक ते दोन किलो युरिया वापरणे आवश्यक आहे . या वापरलेल्या युरिया खतामुळे सेंद्रिय पदार्थातील नत्राचे प्रमाण वाढते . कुजण्याची क्रिया जलद होते व तो नत्र तयार होणाऱ्या कंपोस्ट खतात राहत असल्याने कंपोस्ट खतातील नत्राचे प्रमाणही वाढते.

५) स्फुरद खताचा वापर :-
कंपोस्ट खड्डे भरताना एक ते दोन किलो सुपर फॉस्फेट किंवा 20 किलो रॉक फॉस्फेट प्रति टन सेंद्रिय पदार्थांबरोबर वापरल्यास कंपोस्ट खत लवकर तयार होते व तयार होणाऱ्या कंपोस्ट खतातील उपलब्ध स्फुरद च्या प्रमाणातही लक्षणीय वाढ होते.

सेंद्रिय खत म्हणून शेणखत , कंपोस्ट खत , हिरवळीचे खत , हाडाचे खत व प्रेसमड केक कमी अधिक प्रमाणात वापरतात . कंपोस्ट खत तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत . १) ढीग पद्धत व २) खड्डा पद्धत .दोन्ही पद्धतीत काही फायदे काही तोटे आहेत . परंतु ढोबळ मानाने विचार केला असता जास्त पावसाचे व पाणथळ भागात ढीग पद्धत वापरतात व इतर सर्व ठिकाणी खड्डा पद्धत अवलंबविणे जास्त फायद्याचे ठरते.

१) ढीग पद्धत :-
या पद्धतीमध्ये पायात 2.10 मीटर रुंद , 2.10 मीटर लांब , 1.50 मीटर उंच असा वरच्या बाजूस निमुळता होत जाणारा ढीग रचला जातो . पृष्ठभागावरील रुंदी पायापेक्षा 0.6 मीटरने कमी होते . ढीग पद्धती मध्ये ढीग पट्टा पद्धतीने रचला जातो . प्रथम 20 सेंटीमीटर जाडीचा कर्बयुक्त पदार्थाचा थर व त्यावर दहा सेंटिमीटर जाडीचा नत्रयुक्त पदार्थ थर याप्रमाणे ढीग 1.5 मीटर उंची होईपर्यंत रचला जातो. प्रत्येक स्तरावर पाणी शिंपडले जाते. पृष्ठभाग थोडासा खोल गट करून नंतर हा ढीग सर्व बाजूंनी माती व वाळलेले गवत यांनी झाकून टाका . त्यामुळे ढिगातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही . 6 व 12 आठवड्याने सर्व थरातील पदार्थ संपूर्णपणे पुन्हा खाली वर करून मिसळल्याने विघटन जलद होते. सुमारे 18 आठवड्यात खत तयार होते.

२) खड्डा पद्धत :-
ही पद्धत कमी पावसाच्या प्रदेशात वापरतात . खड्डा शक्यतो उंच जागी असावा. खड्ड्याची खोली एक मीटर पेक्षा जास्त नसावी. रुंदी दोन ते तीन मीटर व लांबी सोयीप्रमाणे साडेतीन मीटर ठेवावी. संरक्षण म्हणून सभोवती एक बांध असावा . दोन खड्ड्यात बरेच अंतर असावे म्हणजे खत भरताना वाहतुकीस सोपे जाते. पावसाचे पाणी त्यावर पडणार नाही यासाठी वरती छत असावे. साधारणपणे प्रत्येक खड्डा सात दिवसात भरला जाणे योग्य ठरते. खड्डा पद्धतीने सेंद्रिय खत उत्तम प्रकारे तयार करता येते.

चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Method Of Making Compost

Leave a Comment