Selection Of Tractors For Agriculture
शेतीसाठी ट्रॅक्टरची निवड
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर बद्दल. ट्रॅक्टर मुळे नांगरणी , कुळवणी , पेरणी एवढेच काय पीक कापणी आणि मळणी सारखी शेतीची कामे चुटकी सरशी आणि अचूक करता येतात . शेतकरी छोटा असो किंवा मोठा ट्रॅक्टरची खरेदी करणे म्हणजे त्याच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो . कारण रोख पैसे देऊन ट्रॅक्टर खरेदी करणारे शेतकरी बोटावर मोजणे इतकेच आहे . बाकी सर्वांनाच बँकेकडून कर्ज काढून ही खरेदी करावी लागते . त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत होऊन घेतलेल्या ट्रॅक्टर मुळे आपल्या शेती उत्पन्नात योग्य प्रमाणात वाढ झालीच पाहिजे . तरच आपला फायदा झाला असे म्हणता येईल. यासाठी आपल्या गरजेनुसार आणी कुवतीनुसार ट्रॅक्टर खरेदी करणे आवश्यक आहे.
१) सर्वात पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर कोणत्या कामासाठी घेणार आहात . फक्त स्वतःच्या शेतातील कामे / ट्रॅक्टर भाडेपट्टीवर दुसऱ्याच्या शेतात वापरणे , मालवाहतूक करणे किंवा ही सर्व कामे करणे.
२) जर तुम्ही फक्त स्वतःच्या शेतातील कामे करण्यासाठी ट्रॅक्टर घेत असाल तर ट्रॅक्टरची निवड खूपच व्यवस्थित करावी .
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
त्यासाठी काही महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे आहेत :-
अ ). तुमच्याकडे शेती किती आहे :-
काही वेळा खूप मोठा ट्रॅक्टर खरेदी केला जातो आणि ताकद पूर्णपणे वापरली जात नाही . त्यामुळे घसारा आणि व्याजापोटी तोटा सहन करावा लागतो . तर कधी कधी कमी ताकदीच्या ट्रॅक्टर घेतला जातो जो शेतीची कामे वेळेत पूर्ण करू शकत नाही . म्हणजे ट्रॅक्टर घेण्याचा उद्देशच सफल होत नाही . वर्षातून एकच पीक होणाऱ्या जमिनीसाठी प्रत्येक दोन हेक्टर जमिनीला एक अश्वशक्ती पुरेशी होते . म्हणजेच 40 हेक्टर जमिनीसाठी 20 ते 25 अश्व शक्तीचा ट्रॅक्टर चांगल्या प्रकारे काम करू शकतो.
ब ) पीक पद्धती :-
बारमाही पाण्याखाली असणाऱ्या जमिनीत एकापेक्षा जास्त पिके घेतली जातात . त्यामुळे शेतीची कामे कमी वेळेत होणे महत्त्वाचे असते . त्यासाठी मोठी अवजारे वापरावी लागतात.
परंतु फक्त एकूण जमीन नव्हे तर त्या जमिनीवर करावी लागणारी कामे या दोन्हींचा एकत्रित विचार करावा . ट्रॅक्टरचा उपयोग वेगवेगळ्या शेती कामांसाठी होतो . जमीन मशागती पासून पेरणी ते पीक कापणी तसेच मळणी आणि वाहतुकीसाठी ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर वापरला जातो . या सर्व कामांमध्ये काही कामे अवघड आणि वेळ खाऊ आहेत . यामुळे ट्रॅक्टरची ताकद ठरवितांना सर्वात अवजड आणि वेळ खाऊ कामाचा किंवा नांगरणी हे काम विचारात घ्यावे . काही तज्ञांचा या गोष्टीला विरोध आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नांगरणीचा विचार करून ट्रॅक्टरची ताकद ठरविणे योग्य नाही . कारण दरवर्षी नांगरणी करण्याची आवश्यकता नसते . त्यामुळे ते काम ट्रॅक्टर भाड्याने घेऊन पूर्ण करणे सोयीचे आहे . तरीसुद्धा पीक पद्धतीनुसार जमिनीचा काही भाग नांगरणीसाठी उपलब्ध असेल तेव्हा वेगवेगळ्या कामांसाठी ठराविक लागणारी शक्ती मोजावी जसे नांगरणी , कुळवणी , पेरणी इत्यादी सर्वात जास्त शक्ती खर्च करणारे काम हे ट्रॅक्टरच्या शक्तीची मर्यादा ठरवेल.
कामासाठी उपलब्ध असणारा वेळ :-
ट्रॅक्टरची अश्वशक्ती ठरविणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे एखाद्या शेतकाम करण्यासाठी लागणारा वेळ होय . जेव्हा वर्षातून एकापेक्षा जास्त पिके घेतली जातात तेव्हा पहिल्या पिकाच्या कापणीपासून दुसऱ्या पिकाच्या लागवडी पर्यंतचा वेळ मागील अनुभवावरून काटेकोरपणे ठरविला जातो . या उपलब्ध वेळेचे मापन करण्यासाठी कमीत कमी चार ते पाच वर्षांचा विचार करावा, तसेच ज्या वर्षात वाईट हवामान होते त्या वर्षातील वेळ विचारात घ्यावा . अशा प्रकारे वेगवेगळ्या शेतकामांसाठी मिळणारे दिवस ठरवावेत . वरील प्रमाणे मिळालेले दिवस पूर्ण वेळ कामासाठी वापरता येत नाही . त्याच्यामागे काही अनाहूत कारणे असू शकतात . जसे मोडतोड , रोजगारी न मिळणे , नैसर्गिक आपत्ती किंवा थकवा इत्यादी . परंतु अनुभवावरून असे दिसून येते की उपलब्ध वेळेचे 80 टक्के वेळ शेतात काम करता येते , याव्यतिरिक्त ट्रॅक्टर आणि अवजार या दोघांचा मिळून कामाचा उरक 70 ते 80% असतो . म्हणजे शेतातील फक्त 70 ते 80 टक्के वेळ हा उपयोगी असतो . बाकीचा वेळ शेवटी बांधावर ट्रॅक्टर वळविण्यामध्ये होतो.
शेतीसाठी ट्रॅक्टरची निवड
क ) मातीचा प्रकार :-
मातीमध्ये काम करताना मातीकडून विरोध होत असतो. अशा प्रकारचा विरोध मातीचे प्रकारावर अवलंबून असतो. जड माती सर्वात जास्त विरोध करते. तर वाळू मिश्रित मातीचा विरोध कमी असतो . हलक्या जमिनीत एखाद्या अवजारे ज्या खोलीवर वेगाने काम करू शकत असेल त्याच प्रकारे काळ्या मातीत दिलेल्या वेळेत काम करू शकत नाही . त्यावेळी ट्रॅक्टरचा वेग कमी करावा लागतो . म्हणजेच जो ट्रॅक्टर हलक्या जमिनीतील सर्व कामे वेळेत पूर्ण करू शकत असेल तोच ट्रॅक्टर भारी जमीनीत कामे वेळेत पूर्ण करू शकत नाही .
वेगवेगळ्या कामांसाठी लागणारी शक्ती आणि वेग जमिनीच्या प्रकारानुसार खालील सारणीत दिल्या आहेत . भारी जमिनीत वापसा येण्यासाठी हलक्या जमिनीपेक्षा जास्त वेळ लागतो . यामुळे कोणत्याही हंगामात भारी जमिनीत काम करण्यासाठी मिळणारा वेळ कमी असतो . वरील सर्व बाबी दर्शवितात की समान क्षेत्रासाठी भारी जमिनीत मोठ्या अश्व शक्तीच्या ट्रॅक्टरची गरज असते.
ट्रॅक्टरची अश्वशक्ती ठरविणे :-
सर्व प्राथमिक माहिती गोळा केल्यानंतर या माहिती आधारे प्रत्येक शेतकामासाठी लागणारी ताकद मोजता येते .
त्यासाठी खालील पद्धत वापरावी
१) उपलब्ध असणाऱ्या वेळेत काम पूर्ण करू शकेल अशा योग्य मापाच्या अवजाराची निवड करणे.
२) या अवजारासाठी लागणारी ताकद मोजणे.
१) अवजाराचे मोजमाप ठरविणे
अ ) एकूण जमीन आणि उपलब्ध वेळ यावरून अवजाराचे मोजमाप करता येते :-
शेतीची कामे करताना आपण किती जमिनीवर काम करणार आहोत याची शेतकऱ्याला माहिती असते . उदाहरणार्थ प्रत्येक दोन वर्षानंतर सर्व जमिनीची नागरणी करावयाची असते . त्यातील 50% जमिनीची नांगरणी दरवर्षी केल्यास नांगरणीसाठी मिळणारा वेळ वाढेल . समजा 20 एकर जमिनीची नागरणी करावयाची आहे आणि त्यासाठी शेतकऱ्याकडे अगोदरच्या पीक काढणीपासून ते पुढच्या पेरणीपर्यंत वेळ मिळतो . त्यातच कुळवणीसाठी , ढेकळे फोडण्यासाठी , बांधबंधिस्तीसाठी वेळ जाणारा असतो . या माहितीवरून उपलब्ध क्षेत्र आणि मिळणारा वेळ काढता येतो . त्यावरून आपण कामासाठी लागणाऱ्या अवजाराची क्षमता खालील सूत्राचा वापर करून काढू शकतो.
अवजाराची क्षमता क्षेत्र (हेक्टर) / वेळ (तास),. (१)
तसेच अवजाराची क्षमता वेग (कि. मी./तास) × रुंदी (मी.)
परंतु अवजारांची पूर्ण क्षमता आपण शेतात काम करताना वापरू शकत नाही म्हणून येणाऱ्या रुंदीला कार्यक्षमतेने भाग घ्यावा सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या अवजारांचा वापराचा वेग आणि कार्यक्षमता यांची माहिती तपासून घ्यावी.
अशाप्रकारे अवजाराची रुंदी मिळेल त्यावरून बाजारातील उपलब्ध रुंदीच्या अवजाराची निवड करावी.
या सर्वांमध्ये फक्त ट्रॅक्टरचे अश्वशक्ती वरूनच अवजारांचा आकार ठरत नाही . अवजाराचे वजन , ट्रॅक्टरची वजन उचलण्याची ताकद , ट्रॅक्टरची भूमिती हे घटक सुद्धा अवजारांचा आकार निश्चित करताना उपयोगी ठरतात. अवजारांची निवड करताना ते ट्रॅक्टरच्या स्थिरतेवर परिणाम करणार नाही याची काळजी घ्यावी.
अवजार चालवण्यासाठी लागणारी अश्वशक्ती मोजणे :-
प्रत्येक अवजार ओढण्यासाठी लागणारे बल किलो प्रति मीटर रुंदी मध्ये असते . अवजारांची रुंदी आपण मोजलेली आहेत. त्यावरून आपण निवडलेले अवजार ओढण्यासाठी लागणारे बल काढता येईल . अवजार वापरण्याचा वेग सुद्धा तपासून घ्यावा . अवजार ओढण्यासाठी लागणारी अश्वशक्ति पुढील सूत्राप्रमाणे काढता येते. वेग (किं. मी./तास) × एकूण बल (की. ग्र.) : ओढण्याची शक्ती (हॉ. पॉ.) / 270 .
ओढण्याची शक्ती ही इतर घटकांवर अवलंबून असते . जसे मातीची परिस्थिती , कामाचा वेग टायरचा आकार , ट्रॅक्टर वरील वजन इत्यादी . परंतु ट्रॅक्टरची अश्व शक्ती सांगण्यासाठी वेगळ्या अश्वशक्ती एककाचा वापर केला जातो . पी. टी.ओ. अश्वशक्ती या अश्वशक्ती वर नमूद केलेल्या घटकांचा परिणाम होत नाही. पी.टी.ओ. म्हणजे ट्रॅक्टरच्या पाठीमागे असणारा एक आस यांच्या वरून मळणी यंत्र , रोटावेटर किंवा पंप चालवता येतो . ओढण्याची शक्ती आणि पीटीओ शक्ती यांच्यातील सर्वसाधारण संबंध तपासून घ्यावेत . त्यावरून पी.टी.ओ. अश्व शक्ती काढता येते.
शेतीसाठी ट्रॅक्टरची निवड
Selection Of Tractors For Agriculture