Mati Parikshan
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण माती परीक्षण या विषयावर माहिती घेणार आहोत. कोणत्याही ऋतू मधील पीक ही मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असतात. आपण मातीची काळजी न घेता फक्त खतांवर अमाप खर्च केलात तरी सुद्धा शेती उत्पन्न वाढवणे कठीण आहे. शेतामध्ये चांगले दर्जेदार निरोगी पीक काढण्यासाठी सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते आणि याच पोषक घटकांची माहिती समजण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे असते. माती परीक्षणावरून जमिनीची सुपिकता, उत्पादकता व आरोग्य समजण्यास मदत होते व पुढील पीक नियोजन योग्य पद्धतीने करता येते.
माती परीक्षण म्हणजे जमिनीची रासायनिक व भौतिक तपासणी. साधारणपणे जमिनीचा सेंद्रिय कर्ब, क्षारांचे प्रमाण, सामू , उपलब्ध स्फुरद व पालाश हे सर्व घटक तपासण्यासाठी माती परीक्षण केले जाते.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
माती परीक्षणाचे उद्देश व उपयुक्तता:-
1) माती परीक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतातील मातीची रासायनिक पृथ:करण करणे आणि जमिनीची सुपीकता ठरविणे होय. माती परीक्षणामुळे जमिनीत काही दोष आढळल्यास तो दोष दूर करण्यासाठी मार्गदर्शन ही मिळते.
2) माती परीक्षणाच्या आधारावर खतांची व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे खताच्या मात्रेत बचत होऊन उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते.
3) माती परीक्षण अहवालाच्या आधारावर पिकाचे योग्य पद्धतीने नियोजन करता येते.
4) माती परीक्षण केल्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या आधारावर पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात रासायनिक खत देणे शक्य होते.
Mati Parikshan
माती परीक्षण नेमके कशासाठी:-
1) जमिनीत उपलब्ध असलेल्या मुख्य, दुय्यम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती करून घेण्यासाठी.
2) प्रत्येक हंगामातील पिकांचे व्यवस्थापन करता यावे यासाठी. 3) पाण्याचे व्यवस्थापन करता यावे यासाठी.
4) जमिनीचे भौतिक गुणधर्म जाणून घेण्यासाठी.
5) जमिनीत उपलब्ध असलेल्या जैविक तत्त्व जाणून घेण्यासाठी. 6) जमिनीची क्षारता व आम्लता याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी.
7) खतावरील अनुषंगिक खर्च कमी करण्यासाठी.
8) जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी.
माती परीक्षण करण्याची योग्य वेळ व घ्यावयाची काळजी:-
ज्यावेळी शेतात कुठलेही पीक उभे नसेल त्यावेळी माती परीक्षण करणे योग्य ठरते. साधारणतः मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून माती परीक्षण करावे. माती परीक्षणासाठी लागणारी माती ही खते न दिलेल्या व मशागत न केलेल्या जमिनीतून घ्यावी.