मृद व जलसंधारण काळाची गरज : Need For Water Conservation Best 0

Need For Water Conservation

मृद व जलसंधारण काळाची गरज

महाराष्ट्र राज्यातील एकूण पाऊस मानाचा विचार केला असता कोकण विभागात 2000 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो तर सोलापूर , अहमदनगर भागामध्ये 500 ते 700 मिलिमीटर पाऊस पडतो. कोरडवाहू भागात पडणारा पाऊस कमी , अनिश्चित , लहरी आणि प्रतिकूल विभागणी असणारा असून पडणाऱ्या पावसाची तीव्रता जास्त असते.

जमिनीची धूप ही पाऊस , वाहणारे पाणी व वारा यामुळे होत असते . भारतात वाऱ्यामुळे जमिनीची धूप राजस्थानात जास्त आढळते . महाराष्ट्रात जमिनीची धूप ही बहुतांशी पाऊस व त्यापासूनच वाहणारे पाणी यामुळे होते . तसेच शेतात अयोग्य राणबांधणी , पाण्याचा अयोग्य वापर , पाणी मुरण्याची व्यवस्था नसणे , अपधाव सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे , इत्यादीमुळे जमिनीची धूप होऊ शकते.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

जमिनीची धूप होण्याची कारणे :-

जमिनीची धूप होण्याची अनेक कारणे सांगता येतील. थोड्या वेळात जास्त तीव्रतेचा पाऊस झाला तर किंवा जमिनीत पाणी मुरण्याच्या वेगापेक्षा पावसाची तीव्रता जास्त असेल तर अपधाव जास्त होऊन त्याबरोबर जमिनीची धूप होते. जास्त उताराचे जमिनीवरून पावसाचे पाणी वेगाने वाहते. वाहणाऱ्या पाण्याला जमिनीत मुरण्यास संधीच मिळत नाही. वेगाने वाहणारे पाणी जमिनीपासून माती वेगळी करून सोबत घेऊन जाते. पावसाची तीव्रता जितकी जास्त तितकी जमिनीची धूप जास्त. जमिनीचा उतार जितका जास्त तितकी जास्त धूप . नदी नाल्यातून वाहणाऱ्या वेगवान पाण्यामुळे नदी नाल्यांचे काठ तसेच नद्यांची तळ वाहून जातात. नदीला पूर आल्यामुळे बऱ्याच वेळा नदीचे पात्र बदलते. तसेच वळणावर बाहेरील भागाची धूप मोठ्या प्रमाणावर होते. अति पावसामुळे कच्चे डोंगर कपारी कोसळतात आणि कोसळलेली माती पाण्याबरोबर होऊन जाते. जोरदार वाऱ्यामुळे सुद्धा मातीचे कडून उडून जातात. या प्रकारची धूप वाळवंटी प्रदेशात जास्त प्रमाणात आढळून येते. जंगलतोड , अनिर्बंध चराई , दरवर्षी नवीन ठिकाणी शेती करणे, शेतीशास्त्राचा विचार न करता चुकीच्या पद्धतीने शेती करणे इत्यादी करणे जमिनीची धूप करणीभूत आहेत.

ज्याप्रमाणे एखाद्या रोगाच्या काही अवस्था किंवा प्रकार असतात . त्याचप्रमाणे जमिनीच्या धूपेची अवस्था प्रकार असतात. धूपीचे मुख्यतः वाऱ्याने होणारी धूप आणि पावसाने होणारी धूप हे दोन प्रकार असतात. पाण्यामुळे होणाऱ्या धूपचे शिंतोडी धूप , साल काढी धुप , ओघळपाडी धूप , घळपाडी धूप नदीकाठची धूप हे प्रकार आहेत.
जगाच्या पाठीवर मनुष्याने जिथे जिथे उताराचे जमिनीवर शेती सुरू केले तीथे तिथे धूपेचा प्रश्न भेडसावत आहे.

जमिनीच्या धूपेचा इतिहास हा शेतीचा इतिहासाचाच एक अविभाज्य भाग आहे. एकेकाळी इजिप्त, इस्राईल , सीरिअल , ग्रीस आणि तुर्की यांच्या सुपीक असलेल्या जमिनी बऱ्याचशा प्रमाणात निकृष्ट झालेल्या आहेत. जंगलतोड झाल्यामुळे पुरांची संख्या आणि तीव्रता वाढल्याचे आढळून आले आहे. आज झाडी नसलेल्या टेकड्या नेहमी दृष्टीस पडतात . भारतात सुमारे 32.6 कोटी हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे दहा कोटी हेक्टर क्षेत्र जमिनीची धूप होते. लागवडीखाली असलेल्या एकूण १३.५८ कोटी हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 5.67 कोटी एकर क्षेत्रावर जमिनीची धूप होते. मध्यवर्ती मृत व जलसंधारण संस्था डेहरादून यांच्या निष्कर्षावरून भारतात दरवर्षी 533.4 कोटी टन माती वाहून जाते . यापैकी 29 टक्के माती समुद्रात जाते तर दहा टक्के माती विविध तळी , धरणे यामध्ये साठते. 61 टक्के माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते.

महाराष्ट्रातील एकूण जमिनींपैकी 1/3 भाग अवर्षण प्रवण किंवा कोरडवाहू म्हणून ओळखला जातो . महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर , बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, कोल्हापूर या 18 जिल्ह्यातील 114 तालुक्यांच्या समावेश अवर्षण प्रवण विभागात होतो. या भागातील जमिनी बेसाल्ट नावाच्या अग्निजन्य खडकांपासून तयार झालेले असून त्याची कण मातीयुक्त अल्प धर्मीय चुनखडीयुक्त तांबूस ते गडत काळा रंगाचे आहेत. या जमिनी सपाट असून 0.5 ते 1.0 इतका शेकडा उतारा असून चिकन मातीचे प्रमाण 55% पेक्षा जास्त आहे . पाणी मुरवण्याचा वेग 0.6 ते 0.8 सेंटीमीटर प्रति तास असतो . अशा जमिनी भिजल्यानंतर फुगतात आणि जमिनीवर लोण्यासारखा मातीचा मऊ थर तयार होतो त्यामुळे पाणी जमिनीत न मूरता वाहून जाते किंवा साठून रहाते. अशा जमिनीत वापसा येत नाहीत. तसेच जमिनीतील ओल कमी होताच भेगाळतात व जमिनीतील ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो.

महाराष्ट्रातील एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी 85 टक्के जमीन जिरायत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास हा प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्राचे विकासावरच अवलंबून आहे. कोरडवाहू क्षेत्राचा विकास हा राज्यात पडणाऱ्या पर्जन्यावर अवलंबून आहे. तथापि राज्यात पडणारा पाऊस आणि अनिश्चित आणि अनियमित स्वरूपाचा असल्याने राज्याला दुष्काळ सदृश्य परिस्थितीला वारंवार तोंड द्यावे लागते . त्यामुळे राज्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठी पाणलोट क्षेत्राच्या विकासामध्ये प्रामुख्याने मृद व जलसंधारणाचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

मृद आणि जलसंधारणाच्या निरनिराळ्या उपचार पद्धती ठरवितांना काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा :-

जमिनीची धूप कशी कमी करता येईल?
पडणारा पाऊस जास्तीत जास्त जमिनीत कसा मुरविता येईल
ज्यादा झालेले पावसाचे पाणी सीताबाहेर सुरक्षितरित्या कसे काढता येईल
आणि असे जादा झालेले पाणी साठविण्यासाठी व पुनर्वापर करण्यासाठी काय व्यवस्था करता येईल.

या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपणास खालील मृद् आणि जलसंधारणाची कामे करता येतील…
१) जमिनीच्या उतारा नुसार जमिनीचे निरनिराळे भाग करणे , त्यानुसार बांध टाकणे व बांधाच्या आतील भागाचे सपाटीकरण करणे , फुटलेले बांध दुरुस्त करणे , योग्य ठिकाणी सांडवा ठेवणे जेणेकरून जादा झालेले पाणी सुरक्षितरित्या शेताबाहेर काढले जाईल . तसेच सांडव्यामधून माती वाहून जाऊ नये म्हणून त्यामध्ये दगडी बांध घालणे, त्याचबरोबर मातीचे बांध पुन्हा पावसाने फुटू नये यासाठी येत्या पावसाळ्यात त्यावर जैविक आच्छादन तयार करण्याचे नियोजन करावे.

२) जमिनीची प्राथमिक मशागत केल्यानंतर पावसाळ्यात पडणारा पाऊस जागच्या जागी मुरविण्यासाठी भारी जमिनीमध्ये उताराला आडवे सरी वरंबे तर हलक्या जमिनीत सहा बाय सहा ते दहा बाय दहा मीटर आकाराचे बंदिस्त वाफे तयार करावेत.

३) शेतामध्ये ज्यादा होणारे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी योग्य ठिकाणी ढाळीचे बांध ठेवावेत जेणेकरून बांध फुटल्यामुळे होणारे प्रचंड नुकसान आपणास टाळता येईल. अशा प्रकारे जादा झालेले पाणी हे पाणी वाहून नेणाऱ्या चारामध्ये सोडावे . चर गवताने आच्छादित असणे आवश्यक आहे . तसेच त्याच्या उतारा बद्दल काळजी घेणे गरजेचे आहे . जेणेकरून जमिनीची धूप होणार नाही.

४) अशाप्रकारे मूलस्थानी जलसंधारण केल्यानंतर शेतातील बाहेर काढलेल्या ज्यादा पाणी हे विहीर पुनर्भरणासाठी किंवा बोर पुनर्वण्यासाठी वापरावे . भूजल पुनर्भरण करताना त्यासाठी आवश्यक तांत्रिक गोष्टींचा पूर्णपणे विचार करावा.

५) किंवा अशा प्रकारे ज्यादा झालेले पाणी आपल्या शेतामध्ये किंवा सामूहिक स्तरावर शेततळे खोदून साठवावे. पाऊस , पाणलोट क्षेत्र , जमिनीचा प्रकार , उतार , पीक पद्धती इत्यादीचा विचार करून शेततळ्याचे आकारमान व ठिकाण ठरवावे.

६) तसेच आपल्या परिसरात असणारे निरनिराळे पाझर तलाव , बंधारे इत्यादी मधील गाळ काढणे त्यांची दुरुस्ती करणे जेणेकरून त्यांची साठवण क्षमता वाढेल.
वरील सर्व गोष्टी वैयक्तिक स्तरार करत असताना गाव पातळीवर किंवा सामुदायिक स्तरावर योग्य ठिकाणी खालील गोष्टींचा विचार करायला हवा :-

  • 1.सलग समतल किंवा तुटक समताल चर.
  • 2. संधारण खड्ड्यातील ढाळीचे बांध.
  • 3. दगडी बांध , गॅबियन बंधारे, वनराई बंधारे , सिमेंट बंधारे , कोल्हापूर पद्धतीचे बंधारे , पाझर तलाव इत्यादी.
  • 4. मृध आणि जलसंधारण या विषयावरील चर्चासत्रे , मेळावे , अनुभवी शेतकऱ्यांचे , शास्त्रज्ञांचे, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन , यशस्वी गावांना भेटीचे सहलीचे आयोजन इत्यादी.

 

सध्या खरीप आणि रब्बी पिकांची काढणी , मळणी इत्यादी कामे उरकून शेतकरी बंधूंना थोडी कामाची वसंत मिळाली असेल. याच हांगामात मृद आणि जलसंधारणाच्या कामाचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यात जास्तीत जास्त पाण्याचे संवर्धन करू शकू आणि आपल्या जमिनीचे आरोग्य टिकवू शकू . त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पूर्वीच्या अनुभवांचा विचार करून जमिनीचा प्रकार , उतार इत्यादी गोष्टी विचारात घेऊन निरनिराळ्या उपचार पद्धतीचे नियोजन करावे.

अशाप्रकारे मृद आणि जलसंधारणाच्या कामांची नियोजन व अंमलबजावणी करून अमूल्य अशा जमिनी व पाणी यासारख्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास थांबविण्यात , भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ करण्यात , कृषी उत्पन्न वाढ करून सातत्य राखण्यात व एकंदर आपले राहणीमान व सामाजिक स्तर उंचावण्यात हातभार लागू शकतो.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Need For Water Conservation

Leave a Comment