Gochid Niyantran Kahi Mahatvache Mudde
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे जनावरांची गोचीडी पासून सुटका करू शकतो. गोचीड घालवण्याचे उपाय बघण्याआधी गोचीड असते काय हे बघूया. जनावरांच्या शरीरावर आणि त्यांच्या शरीराच्या आत बरेच परोपजीवी असतात. यामध्ये काही आपल्या डोळ्यांना दिसणारे आणि काही अतिसूक्ष्म असतात. आता हे दुसऱ्याचे जीवावर जगणारे परोपजीवी करतात काय तर जनावरांना इजा पोहोचवून त्यांना हैराण करून टाकतात आणि त्यांचे रक्त पीत असतात. आता याचपैकी सगळ्यात महत्त्वाचा बाह्य परोपजीवी कीटक म्हणजे कोचीड आहे. गोठ्यातील जवळपास 70 टक्के जनावरांमध्ये या गोचीडीचा प्रादुर्भाव दिसतो. आपल्या देशात जनावरांच्या अंगावर बूफिलास, हायलोओमा , रीफीसि फलस अशा बऱ्याच प्रकारच्या गोचीडी दिसून येतात. आता आपण जनावरांच्या अंगावरील गोचीडी चे कसे नियोजन करू शकतो हे बघूया. तर बघा शेतकरी मित्रांनो वेखंड, सिताफळ, कनेर या तिन्हीपैकी कोणत्याही झाडाची पान वाळवून त्याची पावडर करून जनावरांच्या पाठीवर लावावी तर त्याचा उत्तम रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. कारण या झाडांची पाने बाह्य परोपजीवी साठी कीटकनाशक म्हणून काम करतात. त्यासोबत वेखंड पान 15 ग्रॅम , सिताफळ पान दहा ग्रॅम , कनेर पान पाच ग्रॅम घेऊन त्यात दीडशे-दोनशे मिली पाणी घेऊन ते मिश्रण चाळीस मिली इतका होईपर्यंत उकळून घ्यावा. चोथा बाजूला काढून त्यात कडुनिंब 30 मिली , करंज तेल 30 मिली त्याचबरोबर निलगिरी तेल पाच मिली , जिरेनियम तेल पाच मिली हे तेल उपलब्ध असल्यास टाकावे. मग हे मिश्रण एक लिटर पाण्यात टाकून त्यात साबणचा चुरा टाकावा आणि हे औषध जनावरांच्या अंगावर फवारावे. हे औषध तीन ते चार दिवसांच्या अंतरावर जनावरांच्या अंगावर फवारावे. अगदीच नुसतं निलगिरीचं तेल , कडुनिंबाचे तेल , करंज तेल एकत्र करून सुद्धा त्याचा फवारा जनावरांच्या अंगावर मारू शकतात.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
Gochid Niyantran Kahi Mahatvache Mudde
१) वेखंड
वेखंड या नावाने ओळखली जाणारी वनस्पती आहे. चेतना संस्थेच्या आजारात देखील ही वनस्पती वापरली जाते. या वनस्पतीची पावडर उवा, गोचीड यांसारख्या बाह्य कृमींच्या नियंत्रणासाठी वापराणे फायदेशीर ठरते . ही पावडर जनावरांच्या शरीरावर लावत असताना, केसांच्या उलट दिशेने लावावी, म्हणजे ती केसांच्या मुळांपर्यंत (त्वचेपर्यंत) पोचते.
२) कडुनिंब
कडुनिंब तेल हे बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे तेल जनावरांच्या शरीरावर लावावे. यास असणारा उग्र वास आणि चव यामुळे बाह्य परोपजीवींची भूक नष्ट होते. त्यामुळे ते मरतात.
३) करंज
कडुनिंब तेलाप्रमाणेच करंज तेलामध्ये कीटकनाशक गुणधर्म आहेत. या तेलाचा वापर जनावराच्या शरीरावर लावण्याकरिता करावा. यामुळे बाह्य परोपजीवी मरतात.
४) सीताफळ
सीताफळाची पाने व बी हे चांगले कीटकनाशक आहे. सीताफळाची पाने सावलीत वाळवून याची पावडर करावी किंवा बियांची बारीक पावडर करावी. पावडर जनावरांच्या शरीरावर केसांच्या उलट दिशेने लावावी.
५) बावनचा
बावनचा किंवा बावची या वनस्पतीचे तेल कीटकनाशक म्हणून जनावरांच्या शरीरावर लावावे. यामुळे हे कीटक मरतात.
६) कण्हेर
कण्हेर ही फुलांसाठी प्रसिद्ध असलेली ही वनस्पती. हिची पाने अथवा मूळ परोपजीवींच्या विरोधात अत्यंत गुणकारी आहेत . याचा वापर जनावराच्या शरीरावर बाहेरून लावण्याकरिता करावा. यामुळे देखील बाह्य परोपजीवी मारण्यास मदत मिळते .
७) सिट्रोनेल्ला
सिट्रोनेल्ला गवताचा उग्र वास असतो. सिट्रोनेल्ला, जिरॅनियम या तेलांचा वापर केल्याने बाह्य परोपजीवी जनावराच्या शरीरापासून दूर जातात.
८) निलगिरी तेल
निलगिरी तेलाचा वापर अत्यंत उपयुक्त आहे. या तेलामुळे बाह्य परोपजीवी जनावरांच्या शरीरापासून दूर जातात. तसेच काही बाह्य परोपजीवी मरतात.
याच सोबत अजून एक परिणामकारक उपाय आहे. हा उपाय प्रतिबंधात्मक स्वरूपाचा आहे . पण तो गुणकारी आहे. जर तुम्ही जनावरांना आठवड्याला किंवा चार दिवसात धुवत असाल तेव्हा त्यांना धुवून झाल्यावर गरम पाण्यात मीठ टाकून जनावरांच्या अंगावर चोळून घ्या. हा सुद्धा उपाय तुम्ही नियमित केला तर तुमच्या जनावरांना कधीच गोचीड होणार नाही. पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोठयाची स्वच्छता नियमित करावी आणि गोठा नियमित धुणं या गोष्टी पाळल्या तर तुमच्या जनावरांना कधीच गोचीड होणार नाही. पण जर वेळीच तुम्ही गोचीड नियंत्रण केला नाही तर गोचीडी मुळे होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांमुळे तुमची जनावरे दगावू शकतात.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌